July 19, 2024
Home » बजाजनगर परिसरात भव्यदिव्य श्रीराम पालखी व कलश शोभायात्रा उत्साही वातावरणात संपन्न

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : अयोध्या येथील अयोजीत श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सर्व देश श्री राममय झाला आहे. जिकडे तिकडे भगव्या पताका फडकताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या ओठातून श्री रामांचे भजन निघत आहेत. अनेक मंदिरे रोषणाईने सजली आहेत.

बजाजनगर परिसरातही उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ते श्री राम मंदिर, अयोध्यानगर पर्यंत रविवार 21 जानेवारी रोजी भव्यदिव्य श्री राम पालखी व कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय संस्कृती, लोकसभ्यता आणि विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरली. श्री रामाचा जयजयकार करीत हजारो रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले. डॉल्बीवर जय जय श्रीरामाचा अखंड गजर यामुळे शोभायात्रेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत होते. शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी फुलांची उधळण, रांगोळी, पूजा करून स्वागत केले जात होते. लहान मुलांनी केलेली श्री राम, लक्ष्मण, सीता माता, श्री हनुमान यांची वेषभूषा लक्ष वेधून घेत होती. तसेच भगवे ध्वज घेऊन रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी असल्याने सर्व मार्गावर भगवेमय वातावरण दिसून आले. बजाजनगर परिसरात अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिरात विशेष सेवा घेऊन प्रसाद वाटप करत शोभयात्रेची सांगता करण्यात आली.

तसेच दिनांक 22 जानेवारी रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार अयोध्येतील श्री राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी बजाजनगर सेवा केंद्रात विशेष पुजन व सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक सेवेकऱ्यांनी सदरील सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!