July 22, 2024
Home » सामान्य नागरिकांना दंड; विना नंबरच्या हायवाला वाळूज वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सुट!

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : नेहमी सामान्य नागरिकांना नियम तोडल्यावर दंड लावणारे वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाला सुट देत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक वाळूजच्या कामगार चौकमार्गे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने धावत असतात. या हायवांचे क्रमांक खोडलेले असतात. बुधवारी एका हायवाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला होता. ही घटना घडून दोन तासांचा अवधी उलटत नाही तोच पुन्हा दुपारी तब्बल १५ ते १७ हायवा ट्रकची ये-जा झाली. हायवाचे समोरील क्रमांक अस्पष्ट, तर मागील बाजूने मिटवलेले होते.

कामगार चौकातील अपघातात एकाचा बळी गेला. त्यानंतर दुपारी चौकात एकही वाहतूक पोलिस तैनात नव्हता. दुसरीकडे ए. एस. क्लब चौकात एका अधिकाऱ्यासह पाच पोलिस कर्मचारी तैनात होते. ते वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट, सीटबेल्ट, सिग्नल तोडणाऱ्यांकडे कटाक्षाने लक्ष देत होते. त्यांना दंडही आकारत होते. त्याच वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या हायवाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत होते. विना नंबरच्या हायवाला नेहमच सुट देऊन सामान्य नागरिकांना दंड लावला जात असल्याने नागरिकांकडून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

नियमित कारवाई सुरू …
नियमित कारवाई सुरू असते. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. – सचिन इंगोले, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, वाळूज विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!