July 19, 2024
Home » धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय युवकानं मृत्यूला कवटाळलं

बीडमधील शहाजानपूर लोणी गावात एका २१ वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या का करत आहोत, याचे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितलं राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सरकारदेखील मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक असून कोणी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तरीही तरूण आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशोक मते याने स्वतःच्या शेतात आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग असल्याने चिठ्ठीमध्ये काय आहे? हे सांगू शकत नाही, असं पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भारती यांनी सांगितले. अशोक मते याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जालनामध्ये आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. मराठा आरक्षणासाठी जालना तालुक्यातील पाहेगाव येथे मागच्या १३ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आक्रमक होत आंदोलन करणाऱ्यांमधील दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी जालन्यातील चिकनगाव मधील एका व्यक्तीने मुंबईत आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनील बाबुराव कावळे असं या व्यक्तीचं नाव होतं.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!