July 19, 2024
Home » गणेश विसर्जनाची तयारी वाळूजमध्ये पूर्ण,पोलिसांचा तगडा बंदोबस्त

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी- अनिकेत घोडके

गेल्याकाही दिवसांपासून मुक्कामी असलेल्या गणपतीला निरोप देण्यासाठी वाळूज महानगर परिसरात तयारी करण्यात आली आहे. विसर्जनानिमित्त पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून गणेश मंडळानी ढोल-ताशा, बँड-बाजा आदींची तयारी केली आहे.

वाळूज महानगर परिसरात १०१ सार्वजनिक मंडळानी गणपती उत्सवात सहभाग नोंदविला आहे. बजाजनगर, तिसगाव, वळदगाव, पंढरपूर, साजापूर, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, कमळापूर, जोगेश्वरी, घानेगाव, अंबेलोहळ आदी परिसरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बजाजनगरातील गणपती विसर्जनासाठी सार्वजनिक विहिरीची साफसफाई एमआयडीसीने नुकतीच केली. बजाजनगरातील परिसरात गणेश मंडळाची विविध ठिकाणाहून गणपतीची मिरवणून निघणार आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गणपती विसर्जन मार्गावर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांच्यासह १७ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, १०० अमलदार, १८ पुरूष होमगार्ड, १४ आरपीएफ जवान  एवढा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराणा प्रतापचौक, त्रिमुर्तीचौक व मोरेचौक येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी असेल ‘विसर्जनाची व्यवस्था’
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे हद्दीत ९ ठिकाणी श्रींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात मोरे चौक बजाजनगर येथील सार्वजनिक विहिर, वडगाव पाझर तलाव, जोगेश्वरी पाझर तलाव, सिडको कार्यालयासमोरील सार्वजनिक विहिर, रांजणगावच्या ओमसाईनगरातील सार्वजनिक विहिरी, घाणेगाव पाझर तलाव, तीसगावच्या खवड्या डोंगराची उत्तर बाजु, वडगाव गट नंबरच्या जलकुंभाजवळील खदान व साजापूरचा पाझर तलाव या ९ ठिकाणी ‘श्री’चे विसर्जन केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!