July 20, 2024
Home » बजाजनगरात एटीएम फोडले; घटनास्थळाला उप आयुक्तांची भेट

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

वाळूज महानगर : बजाजनगर येथील अत्यंत गजबजलेल्या चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कट करून फोडले. मात्र यात किती पैसे चोरीला गेले ते अद्यापही गुलदस्त्यात आहे. ही चोरीची घटना सोमवारी (दि.11) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील जय भवानी चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून तसेच विद्युत पुरवठा खंडित करून एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने कट करून आतील रोख रक्कम लंपास केली. या एटीएम मशीन मध्ये किती रक्कम होती हे अद्यापही गुलदस्त्यात असून ते ऑडिट केल्यानंतरच उघड होणार आहे. सोमवारी (दि.11) रोजी पहाटे 2.45 ते 3 वाजेच्या दरम्यान म्हणजेच अवघ्या पंधरा मिनिटात ही चोरी झाली.
या प्रकरणी युरोनेट सर्व्हिस इंडिया प्रा.ली. चे एटीएम अधिकारी नितीन प्रल्हाद वाघमारे रा. गंगोत्री पार्क, वडगांव कोल्हाटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 380, 457 भादवि. प्रमाणे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी शिलवंत नांदेडकर (पोलीस उप आयुक्त झोन १, अशोक थोरात, (सहाय्यक पोलिस आयुक्त, छावणी विभाग, अविनाश आघाव पोलीस निरीक्षक एमआयडीसी वाळूज, प्रविणा यादव झोन १ चेकिंग अधिकारी, गौतम वावळे सहायक पोलीस निरीक्षक, सचिन पागोटे पोलीस उपनिरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!