July 23, 2024
Home » वाढत्या चोऱ्या, लुटमारीने उद्योजक हैराण

मसिआ, पोलीस अधिकाऱ्यांची बैठक तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी- अनिकेत घोडके

वाळूज औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस चोऱ्याचे प्रमाण वाढत असून यामुळे उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी मसिआच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.८) वाळूज पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत झालेल्या बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढून उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे मसिआ अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले. यावेळी वाळूज पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


वाळूज हा औद्योगिक वसाहतीचा परिसर आहे. रात्री अपरात्री कामगारांना कंपनीतून कामावर व कामावरून घरी जावे लागते. यातील अनेक कामगार दुचाकी अथवा सायकलने प्रवास करत असतात. ही नेमकी संधी साधत क्षेत्रामध्ये सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत कर्मचारी, कामगार यांना धमकावणे, त्यांच्याकडील पैसे, मोबाईल इत्यादी वस्तू हिसकावणे असे प्रमाण वाढले आहे. यामुळे हा सर्व कामगारवर्ग रात्रीच्यावेळी कंपनीत कामावर येण्यास धजत नाही. यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. यातून उद्योजकांसमोर संकट निर्माण होते. ही बाब अध्यक्ष अनिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या निदर्शनास आणून दिली. वाढत्या चोरीच्या प्रकारामुळे उद्योजक हैराण झाले आहेत. सदरील समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून त्या अंमलात आणाव्यात अशी विनंती यावेळी मसिआच्यावतीने करण्यात आली. बागवडे यांनी यावर उपाय म्हणून रात्रीच्यावेळी पोलिसांचे गस्तीच्या फेऱ्या वाढवल्या जातील असे सांगितले तसेच उद्योजकांनी देखील सीसीटिव्ही बसवावे असे आवाहन केले. जेणेकरून गुन्हेगाराला ओळखणे आणि पकडणे सोईचे होईल. शिवाय पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगून लवकरात लवकर शक्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सय्यद हेदेखील बैठकीसाठी उपस्थित होते. सदरील बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याने यावेळी मसिआच्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. बैठकीसाठी मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर पाटील, सहसचिव सर्जेराव साळुंके, कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, अजय गांधी, सलिल पेंडसे यांच्यासह उद्योजक दयानंद मोदाणी, संजय भाताडे, दीपक तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!