July 21, 2024
Home » ‘मी खंबीर आहे, नव्याने उभं करू’, शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

न्युज मराठवाडा वृत्तसेवा मुंबई :

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा अक्षरश: चिखल झालेला बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे हे आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेत नाही. पण या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीय. शरद पवार यांची या घडामोडींवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!