July 26, 2024
Home » व्यापाऱ्याला रत्यात अडवून मारहाण करीत २७ लाख रुपये लुटले
  • सोलापूर – धुळे महामार्गावरील घटना

वाळूज महानगर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी भर रस्त्यात कार अडवून व्यापाऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण करीत २७ लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी (दि.२०) रात्री आठ वाजेच्या सुमारास सोलापूर – धुळे महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळ घडली.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ मनोहर तायडे (रा. देवळी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर) व त्यांचा कार चालक अनिल भुसारे हे सोमवारी (दि.२०) रात्री औरंगाबाद येथून कार ( एम एच २० सी एस -३९१५) ने धुळे-सोलापूर महामार्गावरून घरी देवळी येथे जात होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास ते लासुरकडे जाण्यासाठी करोडी येथील उड्डाण पुलावरून वळण घेत असतांना डामोरून लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी तायडे यांच्या कार समोर दुचाकी आडवी लावून अचानक तायडे यांच्या कारला लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तायडे कारमधून बाहेर आले. तायडे कारच्या बाहेर येताच दोघा भामट्यांनी तायडे यांनाही लाकडी दांड्याने मारहाण करत कारमधील २७ लाख रुपये असलेली बाग हिसकावून भामटे दुचाकीवरून सजापुरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान घटनेची माहीत मिळताचपोलीस उपायुक्त दीपक गिरे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगर, स.पोलीस निरीक्षक गीते, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, सचिन वायाळ, पोहेकॉ. राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे सुरज अग्रवाल, आयुब पठाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.


कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी…

धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी पुलाजवळ कायम लुटमरीच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या लुटमारीत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटना रोखण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या पुलावर कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे असे लासुरचे उपसरपंच संपत छाजेड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!