July 23, 2024
Home » वाळुज येथे अनोखाच वाढदिवस


वाळूजमहानगर : आतापर्यंत आपण नेते मंडळीसह आमदार, खासदार तसेच लहान मुलांचा, तरुणांचा तसेच वयोवृद्ध असे अनेक वाढदिवस पाहिले असतील, साजरेही केले असतील. मात्र वाळूज येथे अनोखाच वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त आरोग्यासाठी वर्धक असा मोलाचा संदेशही देण्यात आला. त्यामुळे या वाढदिवसाचे लहान थोरांसह जनमानसातून कुतूहल व्यक्त होत आहे.

हा वाढदिवस म्हणजे कोण्या नेत्यांचा नव्हे, तर तो होता झाडांचा. आपण नेहमी प्रमाणे ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. त्याच पद्धतीने हा झाडांचा अनोखा असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी हार, फुल, केक, चॉकलेट असे सर्व साहित्य आणण्यात आले. हा वाढदिवस जरी नेत्यांचा नसला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.2) जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता, पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा आरोग्यासाठी वर्धक असा संदेश देण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाची सर्व जनमानसातून चर्चा होत आहे.

याबाबत माहिती अशी की, वाळूज येथील कलानगर मध्ये गेल्यावर्षी श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिर परिसरात 2 जानेवारी 2022 रोजी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव पाठे यांनी रोपांची पूर्तता करून दिली होती. मंदिर समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ही रोपटे मंदिर परिसरात लागवड केली, आणि पाहता पाहता ती जोमाने वाढली. विशेष म्हणजे त्यातील सर्वच्या सर्व झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्यात आले. वड, पिंपळ, चिंच, लिंब, जांभूळ. अशी ऑक्सिजन देणारे हे झाडं आज टवटवीत असून ती डोमाने डौलत आहे. सोमवारी (ता.2) रोजी या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप कल्याण महाराज भुजंग होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव पाठे, शिवराई आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील, आर के भराड, बाबासाहेब साळुंखे, शिक्षक करतारसिंग पवार, ज्ञानेश्वर मोकळे, दीपक नागरे, राहुल गोमलाडू, आनंद डुकरे, शर्मिला देसले, योगिता पाटील, गीतांजली शिंपी, कैलास वाघचौरे यांच्या विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कल्याण महाराज भुजंग, लक्ष्मणराव पाठे, आर के भराड यांनी मार्गदर्शन करून पर्यावरण संरक्षणाचा सल्ला दिला. प्रथम उपस्थित मान्यवर व महिलांनी झाडांचे पूजन करून औक्षण केले. त्यानंतर केक कापून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश न देता, मानवी आरोग्यास वर्धक असणाऱ्या झाडांचे (पर्यावरण) संवर्धन व संरक्षणाचा संदेश एकमेकांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के भराड यांनी केले. तर ज्ञानेश्वर मोकळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. श्री गजानन महाराज मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे गणेश जगताप, नामदेव मोरे, आर के भराड, अनंता वाघ, रामदास वाघ, महेंद्र बोराडे, परमेश्वर म्हस्के, शशिकांत आऔटे, अर्जुन कडूस यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ – वाळुज येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात झाडाच्या वाढदिवसानिमित्त पूजन करताना हभप कल्याण महाराज भुजंग, लक्ष्मणराव पाठे, भगवान पाटील, आर के भराड, गणेश जगताप व औक्षण करताना महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!