July 22, 2024
Home » अल्पवयीन बाल विवाह रोखला; जोगेश्वरी येथील घटना

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : आज दि ३० रोजी अल्पवयीन मुला-मुलीचा वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे बाल विवाह रोखण्यास शासकीय यंत्रणेला यश आले आहे. या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी मुले सज्ञान झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची हमी दिल्याने हा नियोजित बाल विवाह टळला.


जोगेश्वरी येथील या अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह त्यांच्या पालकांनी आज शुक्रवारी जोगेश्वरीत आयोजित केला होता. या बालविवाहाची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांना मिळताच त्यांनी गंगापूरच्या महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका मिना काळे यांना माहिती देऊन हा बाल-विवाह रोखण्याचे आदेश दिले होते. यानंतर बालविकास अधिकारी सुरेखा पाटील विवाह आयोजित केलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी बाल संरक्षण कक्ष अधिकारी कल्पना मोहिते, चाईल्ड हेल्पलाईनचे राजेश सरकटे, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस बंदोबस्तात लग्नासाठी जमा झालेले कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली असता वर अल्पवयीन मुलगा विवाहस्थळी मिळून आला तर वधु मुलगी ही विवाहस्थळी पोहचली नसल्याचे दिसून आले. बालविवाहासाठी हजर असलेल्या वधु-वराचे नातेवाईक तसेच पालकांचे समुपदेशन करुन बाल विवाह हा कायदेशिर गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.

कोवळ्या वयात लग्न झाल्यास मुला-मुलीचा शारिरीक व मानसिक विकास खुंटुन आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पटवून दिले. लग्नाचे वय झाल्यानंतरच मुला-मुलीचा विवाह करण्याचा सल्ला शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला. या समुपदेशनानंतर बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच कायद्याच्या भितीमुळे अल्पवयीन मुला-मुलीच्या पालकांनी विवाह थांबविण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्नाचे वय झाल्यानंतरच त्यांचे लग्न लावुन असे हमीपत्र वधु-वराच्या पालकांनी दिल्यानंतर हा बाल विवाह टळला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!