July 18, 2024
Home » नूतन जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी

वास्‍तुशास्‍त्रीय आराखडे तयार करुन परिपुर्ण प्रस्‍ताव शासनाकडे सादर करा – संदीपान भूमरे

औरंगाबाद

विश्‍वासनगर-लेबर कॉलनी येथील १४ एकर शासकीय जागेवर प्रस्तावित नूतन जिल्‍हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्‍यासाठी प्रस्‍ताव, अंदाजपत्रक, वास्‍तुशास्‍त्रीय आराखडे तयार करुन परिपुर्ण प्रस्‍ताव मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी दिले.

पालकमंत्री श्री भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास नगर येथील शासकीय जागेबाबत बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्‍हाधिकारी आस्‍तीक कुमार पाण्‍डेय यांनी पालकमंत्री यांना याप्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले की, विश्‍वासनगर-लेबर कॉलनी, औरंगाबाद येथील शासकीय जागेवर अनधिकृत व्‍यक्‍तींनी केलेले अतिक्रमण व बेकायदेशिर कब्‍जा, तसेच सदर सेवा निवासस्‍थाने अतिशय जीर्ण व राहण्‍यासाठी धोकादायक झाले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानुसार 11 मे रोजी ही जागा मोकळी करुन शासनाच्या ताब्‍यात घेण्‍यात आलेली आहे.
अंदाजे १४ एकर जागेवर नूतन जिल्‍हाधिकारी कार्यालयाची सुसज्‍ज ३ मजली इमारतीच्‍या प्रस्‍तावाचे सादरीकरण झालेले आहे.

त्‍यानुसार नूतन इमारतीत जिल्‍हाधिकारी कार्यालया अंतर्गत सर्व विभाग,मुख्‍यमंत्री,  उपमुख्‍यमंत्री यांची दालने, सचिव दर्जाच्‍या अधिका-यांसाठी दालने व बैठक व्‍यवस्‍था ,मंत्रीमंडळाच्‍या बैठकीसाठी, जिल्‍हा नियेाजन समितीच्‍या बैठकीसाठी २०० आसन क्षमतेचे २ सुसज्‍ज हॉलचा समावेश करण्‍यात आलेला असून याबाबतचा वास्‍तुशास्‍त्रीय प्रारुप आराखडा  व  अंदाजपत्रकाच्या प्रस्‍तावास  पालकमंत्री यांनी मान्‍यता देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी केली.

बैठकीत पालकमंत्री श्री भूमरे यांनी सर्व वास्‍तुशास्‍त्रीय आराखडे व अंदाजपत्रकाचे अवलोकन करुन त्यास मान्‍यता दिली. पुढील मंजुरीसाठी सर्व प्रस्ताव महसुल विभागामार्फत शासनास तात्‍काळ सादर करण्‍याचे निर्देश दिले.

यावेळी अशोक ये‍रेकर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,शेख वहीद उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्‍तर उपविभाग, श्रीमती अ.अ. वाघवसे वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,संतोष वाकोडे वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,श्रीमती सोनम पाटील वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, विवेक जोशी शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्‍तर उपविभाग आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!