July 26, 2024
Home » आशिव येथे भारतीय जैन संघटनेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न; भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर


लातूर : भारतीय जैन संघटना भूकंपग्रस्त प्रकल्प वाघोली (पुणे) शैक्षणिक संकुलातील लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवारी (दि.२६) आशिव (ता. औसा) येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडला. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी भारतीय जैन संघटनेने सर्व घटकांना सोबत घेऊन सुरू केलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त करीत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सालाबादप्रमाणे या वर्षी आशिव ( ता.औसा ) येथे भारतीय जैन संघटना भूकंपग्रस्त प्रकल्प वाघोली (जि.पुणे) शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आशिव येथे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. दिनकर माने तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, नेताजी गोरे, गोविंद मदने, जि.प. सदस्य राजेंद्र माने, युवराज माने, नामदेव काकडे , अण्णासाहेब लोभे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. अशोक पवार यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केल्या जात असलेल्या कामाची माहिती देत दरवर्षी मेळावा का घेतला जातो याची माहिती दिली. यावेळी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी भारतीय जैन संघटनेने १९९३ च्या भूकंपात उध्वस्त झालेल्या लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत या भागातील अनेक कुटुंबाना आधार दिला. सर्व घटकांना सोबत घेऊन केले जात असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगून भारतीय जैन संघटनेचे कौतुक केले. तसेच त्यांनी महापुरुषांचे दाखले देत भारतीय संस्कृती सोबत संस्कारक्षम मुलं घडवा. व्यक्ती विकासात नैतिकतेसोबत प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी ठेऊन कार्य करत राहा असा उपस्थित विद्यार्थ्यांना सल्लाही दिला. यावेळी आ. दिनकर माने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आशिव येथील माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बनकर व प्रवीण गिरी यांनी केले. तर आभार प्रा. राजेंद्र कांबळे यांनी केले. मेळाव्याला लातूर- उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाकर माने, हनुमंत घोडके, सुनील बगल, अमोल जगताप, महादेव काकडे, नागनाथ वळके, चंद्रकांत घोडके, पुरुषोत्तम घोडके, महेश काकडे, गौतम बनसोडे, हरिदास जगताप, ज्ञानदेव शिंदे, धनराज बनसोडे, विनोद जगताप आदींनी परिश्रम घेतले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी बालाजी साठे, माधव माने, बाबासाहेब कांबळे, गौतम बनसोडे यांचा तसेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या पुजा कदम , नीतिशा जगताप, अभिजित जगताप, प्रतिक्षा पिंपरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. यासोबत गावातील शिष्यवृत्ती, शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

स्व. प्रा. चंद्रकांत हिंडोळे यांच्या आठवणींना उजाळा

भारतीय जैन संघटना महाविद्यालय वाघोली येथे कार्यरत असलेले मूळ कानेगाव (ता. लोहारा ) येथील प्रा.चद्रकांत हिंडोळे यांचे ह्रदयविकाराने नुकतेच निधन झाले. कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात अली. यावेळी उध्दव कदम , बाबासाहेब दुधभाते, पद्माकर गोरे, लिंबाजी परताळे यांनी आपल्या मनोगतातून स्व. प्रा. हिंडोळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!